विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “जर तुम्ही आमच्या देशात घुसून निष्पाप लोकांची हत्या करणार असाल, तर देश कधीच शांत बसणार नाही. धर्माच्या नावाखाली आमच्या नागरिकांना मारणाऱ्यांना धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही. पाकिस्तान इसिससारखं वागत आहे,” अशा तीव्र शब्दांत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
( You are behaving like ISISAsaduddin Owaisi attacks Pakistan)
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव चिघळला असून, देशभरातून केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या.
ओवैसी म्हणाले, “सत्ताधारी भाजप नेहमी म्हणते की, घरात घुसून मारू. आता जर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करायची असेल, तर प्रत्यक्षात घरात घुसून बसायला हवं.” त्यांनी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची आठवण करून दिली, ज्यात पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.
“जर ते आपले घर आहे, तर आता वेळ आली आहे तिथे जाऊन बसण्याची. पाकिस्तानी सैन्य अनेक ठिकाणी माघारी गेल्याचे संकेत आहेत. त्यामुळे भारताने आता निर्णायक पावले उचलायला हवीत,” असे ओवैसी म्हणाले. त्यांनी याआधी मुंबई, उरी, पुलवामा, पठाणकोट, रियासी आणि आता पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांची आठवण करून दिली.
“पाकिस्तान अनेकदा अणुबॉम्बचा हवाला देतो, पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे – अणुबॉम्बची धमकी देत बसण्यापेक्षा निष्पाप लोकांचे रक्त सांडाल, तर भारत गप्प बसणार नाही,” असा स्पष्ट इशाराही ओवैसी यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, “दहशतवाद संपवण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता वेळ आली आहे की केंद्र सरकारने ठोस पावले उचलून या संकटाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.”
