काँग्रेस फोडा, रिकामी करा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रातील निवडणुकांनंतरही पक्षांतराचे वारे शांत झालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला लक्ष्य करत पक्षातील कार्यकर्त्यांना थेट आदेश दिला आहे हलकी “काँग्रेस फोडा, रिकामी करा! ( Break up Congress empty it Chandrashekhar Bawankules advice to workers)

पुण्यातील पक्ष बैठकीत बोलताना बावनकुळे म्हणाले, “काँग्रेस जितकी खाली जाईल, तितका तुमचा राजकीय फायदा होईल. माझं काय होईल याची काळजी करू नका, देवेंद्रजी आणि मी आहोत. आम्ही न्याय देणारच.” काँग्रेसमधील कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यास आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

बावनकुळे म्हणाले, काँग्रेसमध्ये काही उरलेलं नाही. शरद पवारांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष कोलमडला आहे. त्यांना स्वतःची पार्टी सांभाळता येत नाही. शिवसेना (ठाकरे गट) चे लोक आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केल्याने अनेकांनी आमच्यात यायचा निर्णय घेतला. काँग्रेसला दिशा नाही, धोरण नाही. जो कोणी येईल, त्याचे स्वागत आहे. इतके जण येत आहेत की तुम्ही थकून जाल.

बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्याला मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील महिन्यात महामंडळांमध्ये कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या होतील असेही सांगितले. “आता आम्हाला कानमंत्र देण्याची गरज नाही. पुढची १५ वर्षे महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार राहील,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवताना बावनकुळे म्हणाले, “लोक आता त्यांना सिरीयसली घेत नाहीत. ते स्वतः लिहितात, छापतात आणि वाचतात.

दरम्यान, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “काँग्रेस संपवण्याचे स्वप्न पाहू नका. हा पक्ष लोकांनी विचारधारेवर उभा केला आहे. काँग्रेसप्रती लोकांची निष्ठा टिकून आहे. अशा बोलणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा.