विशेष प्रतिनिधी
नाशिक : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत,अशी टीका त्यांनी केली. ( Oppositions talk on loan waiver is like crocodile tears says Sadabhau Khot)
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले, कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना विरोधकांनी आता गळा काढू नये. सरकारने कायदे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरोधक मांजरासारखे आडवे गेले. कर्जमाफीसाठी किमान ५ वर्षांचं आयात-निर्यात धोरण हवं आहे. तुम्हीही कर्जमाफी करणार होतात, मग त्याचे काय झाले? आज शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच आहे, हे मलाही वाटते. पण केवळ कर्जमाफी करून उपयोग नाही, शेतकऱ्यांवरची बंधने तशीच ठेवणार असाल, तर तो पुन्हा त्याच परिस्थितीत जाणार.
खोत यांनी कांदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मधील एक किस्सा सांगत महाविकास आघाडी वर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “त्यावेळी आंदोलन शांततेत पार पडले, कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र सरकारने आंदोलन चिरडण्याचा विडा घेतला होता. त्या वेळी एसपी सचिन पाटील होते. त्यांनी किरकोळ कलमे लावल्याबद्दल कर्मचाऱ्यांना झापले. शेतकऱ्यांचे पोर अधिकारी झाल्यावर कसे मस्तवाल होतात याचे हे उदाहरण.
माझ्यावर 263 गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्येक आंदोलनस्थळी मी आहे, असे गृहित धरून गुन्हे दाखल केले गेले. आम्ही विस्थापितांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलो, म्हणून गुन्हे झाले. हे नेते नव्हते, शेतकऱ्यांचे खळं लुटणारे होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, “आज देशात मातीकडून जातीला महत्त्व दिलं जातंय. ज्याची जात श्रेष्ठ तो वजनदार अशी नवीन वाट आता तयार झाली. जातीच्या आधारे मतांचं राजकारण होतं. मातीतला शेतकरी जोपर्यंत व्होट बँक होणार नाही, तोपर्यंत त्याचं काही होणार नाही.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्यावर खोत म्हणाले, “महाविकास आघाडीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाचं निमंत्रण का दिलं नाही? आता हवेतल्या बार मारत आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करताना खोत म्हणाले, राज्याला कणखर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निमित्ताने मिळाला. अनेक महसूल मंत्री बघितले पण आजच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे सगळ्यात कार्यक्षम मंत्री आहे.
समाजकल्याण विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविल्याने सुरू वादावर खोत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्रिपद एका अभ्यासू नेत्याकडे आहे.जनतेच्या विकासासाठी निधी येतो. निधी थांबवला हे बोलण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाला निधी देऊन राहिलेला निधी वर्ग केला जातो. बजेट सादर करतो त्याचा अर्थ तो पैसा हातात नसतो ते नियोजन असते. सगळ्या योजनेची जबाबदारी सामुदायिक आहे
जलजीवन मिशन कामांचा दर्जा घसरला आहे. अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये कॉन्ट्रॅक्टची टोळी काम करत आहे. पाणी देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट की घसा कोरडा ठेवण्यासाठी हे कळत नाही, असा आरोप खोत यांनी केला.
