विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :पहलगाममधील २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईबाबतची अधिकृत माहिती बुधवारी दिल्लीत प्रसिद्ध देण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संयुक्तपणे पत्रकारांना माहिती दिली.
( Precise strikes on nine terrorist camps in Operation Sindoo joint information from Army and Air Force)
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी केंद्रांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. ही केंद्रे लष्कर-ए-तोयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या थेट नियंत्रणात होती. हे सर्व हल्ले २६ हिंदू पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ व बदल्यात करण्यात आले होते.
लक्ष्य केलेली ९ ठिकाणं आणि त्यांचं महत्त्व :
बहावलपूर (पंजाब, पाकिस्तान) – जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय. भरती, प्रशिक्षण आणि नियोजनाचं केंद्रबिंदू.
मुरिदके (पंजाब, पाकिस्तान) – लष्कर-ए-तोयबाचं शिक्षण व दहशतवादी लॉजिस्टिक मुख्यालय. याच ठिकाणी अजमल कसाब याला २६/११ साठी प्रशिक्षित करण्यात आलं.
तहरा कलन (पंजाब, पाकिस्तान) – LeT आणि JeM च्या ऑपरेटिव्हसाठी सुरक्षित आश्रयस्थाने आणि प्रशिक्षण शिबिरे.
सियालकोट (पंजाब, पाकिस्तान) – दहशतवाद्यांच्या हालचालींसाठी महत्त्वाचा लॉजिस्टिक बेस.
भींबर (पाकव्याप्त काश्मीर) – भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी ट्रांझिट पॉईंट.
कोटली (पाकव्याप्त काश्मीर) – विविध दहशतवादी गटांचे प्रशिक्षण व सुरक्षित निवासस्थाने.
मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – अतिरेकी संघटनांसाठी प्रशासनिक व नियोजन केंद्र.
बिलाल मशीद, मुझफ्फराबाद – दहशतवाद्यांच्या बैठकांसाठी व नियोजनासाठी धार्मिक ठिकाणाचा वापर.
अहमदपूर ईस्ट (बहावलपूर जिल्हा, पंजाब) – दहशतवादी गटांसाठी शस्त्र साठवणूक व पुरवठा केंद्र.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केलं की, ही कारवाई फक्त ठोस गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली होती. सर्व लक्ष्य भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया राबवणाऱ्या तळांवर केंद्रित होती आणि पाकिस्तानच्या लष्करी स्थळांना कोणताही धक्का न लावता ही मोहीम पार पाडण्यात आली.
या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता व्यक्त करण्यात आली असून, भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा, असं आवाहन अनेक राष्ट्रांनी केलं आहे. मात्र भारताने स्पष्ट केलं आहे की, देशाच्या सुरक्षेवर हल्ला झाला तर भारत शांत बसणार नाही आणि भविष्यातही दहशतवादाविरुद्ध अशाच निर्णायक कृती घडवून आणल्या जातील.
