उद्धव ठाकरे भान हरवलेले नेते; मुंबईकडे फिरवली आहे पाठ, आशिष शेलार यांची टीका

विशेष प्रतिनिधी
मुंबई : “उद्धव ठाकरे म्हणजे भान सुटलेले, राजकीय वास्तवापासून दूर गेलेले आणि मुंबईच्या प्रश्नांपासून पळ काढणारे नेते आहेत,” अशी कडवट टीका भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी केली. विधानसभा निवडणुकीतील निकाल, मतदारांचा कौल आणि ठाकरे यांचे वर्तन यावरून त्यांनी उघडपणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ( Uddhav Thackeray is a leader who has lost consciousnessHe has turned his back on Mumbai Ashish Shelar criticizes)

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून ‘एकतर तू राहशील नाहीतर मी’ असे विधान केले होते. पण या विधानाचा निकाल जनतेने दिला. आज कुठे आहेत देवेंद्र फडणवीस आणि कुठे आहेत उद्धव ठाकरे?” असा सवाल करत शेलार म्हणाले, “आज ठाकरे हे टीव्हीवरच अधिक दिसतात; प्रत्यक्ष रस्त्यावर, गटारींवर, नागरिकांच्या समस्या सोडवणाऱ्या ठिकाणी त्यांचा काहीही सहभाग नाही.”

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शेलार म्हणाले, “महायुती एकसंघ आणि तयारीत आहे. मागच्या दीड वर्षांपासून आम्ही मैदानात आहोत. मुंबईकरांचा सेवेकरी कोण आहे हे या निवडणुकीत ठरेल. महाविकास आघाडीला ५० पेक्षाही कमी जागा मिळतील, याबाबत मला पूर्ण खात्री आहे.”

“मतदारांचा विचार केवळ निवडणुकीपुरता करायचा नाही, हे भाजपचे धोरण आहे,” असे सांगत त्यांनी ठाकरे-पुत्र जोडीवर हल्ला चढवला. “मी रोज मुंबईभर फिरतोय. उद्धव आणि आदित्य ठाकरे कुठेच दिसत नाहीत. त्यांचा मुंबईशी फक्त टीव्हीपुरता संबंध उरला आहे. त्यांनी फक्त स्टुडिओमध्ये बसून वक्तव्य करावीत आणि मतं आपोआप मिळतील, असा समज करून घेतला आहे.”

छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार म्हणाले, “हे तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आमच्यात निर्णय प्रक्रिया विचारपूर्वक होते. विरोध करणारे केवळ घरात बसून सोशल मीडियावर टीका करतात. त्यांनी रस्त्यावर यावे आणि लोकांच्या भावना जाणून घ्याव्यात. त्यानंतर त्यांना स्वतःचं स्थान समजेल.”