विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : दिल्लीहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2142 या प्रवासी विमानावर प्रवासादरम्यान अचानक गारपिटीचा तडाखा बसला. हवेत उड्डाण करत असताना आलेल्या या हवामानातील तीव्र बदलामुळे विमान तीव्र हेलकावे खाऊ लागले आणि संपूर्ण विमानात प्रचंड घबराट पसरली. वैमानिकाने तत्काळ श्रीनगर विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आणि संध्याकाळी ६:३० वाजता विमान सुरक्षितपणे लँड करण्यात यश आले. ( Escape from the jaws of deathIndiGo flight from Delhi to Srinagar hit by hailstorm)
प्रवाशांनी या अनुभवाचे वर्णन “मृत्यूच्या दाढेतून परत आल्यासारखं” असे करत आपला जीव वाचल्याबद्दल पायलट आणि क्रूचे आभार मानले.
इंडिगो एअरलाइन्सने म्हटले की, “दिल्लीहून श्रीनगरकडे जाणारी आमची फ्लाइट 6E 2142 मार्गावर अचानक आलेल्या गारपिटीमुळे तीव्र हवामानाचा सामना करत होती. आमचे वैमानिक व केबिन क्रू यांनी सर्व निर्धारित SOP नुसार कार्य करत विमान सुरक्षितपणे श्रीनगरला उतरवले. प्रवाशांची आरोग्य व सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत त्यांची आवश्यक काळजी घेण्यात आली.”
याच दरम्यान, सोशल मीडियावर आलेल्या प्रत्यक्षदर्शी छायाचित्रांमध्ये विमानाच्या पुढील नाकाच्या भागाला झालेल्या स्पष्ट नुकसानाचे दर्शन घडते. यामुळेच विमानाला ‘Aircraft On Ground’ (AOG) म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, विमान तांत्रिक दृष्ट्या उड्डाणासाठी सध्या असमर्थ आहे आणि तपासणी व दुरुस्तीशिवाय पुन्हा सेवा सुरू होणार नाही.
या विमानात प्रवास करणाऱ्या ओवैस मकबूल हकीम यांनी एक्सवर लिहिले की, “मी त्या विमानात होतो. विमानाच्या नाकाला गंभीर इजा झाली आहे. संपूर्ण विमानात प्रचंड गोंधळ होता, लोक किंचाळत होते. आम्ही सुरक्षित उतरलो हीच एक चमत्कार वाटतोय.”
दुसरे प्रवासी शेख समीउल्लाह यांनी अनुभव सांगताना म्हटले, “पायलटने अचानक सीट बेल्ट लावण्याचा इशारा दिला आणि काही क्षणांत विमान जोरात हलायला लागलं. मी अनेक वेळा प्रवास केला आहे, पण अशा प्रकारचं थरारक संकट पहिल्यांदाच अनुभवलं. वैमानिकाचे खूप आभार.”
विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअरक्राफ्टचा पूर्ण तपास व आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच ते पुन्हा सेवा देण्यासाठी सोडले जाईल. कंपनीच्या तांत्रिक टीमने तपासणी सुरू केली असून संभाव्य गारपिटीने रेडार, नाकाचा भाग आणि विंडशील्डवर झालेल्या परिणामांचा अंदाज घेतला जात आहे.
