सुप्रिया सुळे यांची केंद्रात मंत्री होण्याची जुनी इच्छा, संजय शिरसाट म्हणाले शरद पवार जाणार दुसया पक्षात

विशेष प्रतिनिधी
मुंबई : “सुप्रिया सुळे यांची केंद्रात मंत्री होण्याची इच्छा जुनी आहे. त्या मंत्री होऊ शकतात, यात शंका नाही. कारण राजकारणात काहीही अशक्य नसते,” असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. ( Supriya Sules old desire to become a minister at the centerSanjay Shirsat said Sharad Pawar will go to another party)

ते म्हणाले, “मला वाटतं की भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील. शरद पवार हे या महिन्याच्या अखेरीपर्यंत महायुतीत सामील होणार नाहीत, पण पुढच्या महिन्यात म्हणजे १५ तारखेपर्यंत काही मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ही माहिती राजकीय वर्तुळातून मिळालेली आहे. खरी की खोटी हे सांगता येणार नाही, पण लवकरच शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा आहे.”

महाविकास आघाडीबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले, “रोहित पवार म्हणतात, मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडी म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र. पण मानसन्मानाचा प्रश्नच कुठे येतो? त्यांनाही माहीत आहे की महाविकास आघाडीसोबत ते राहणार नाहीत. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग स्वीकारत आहेत, काका (अजित पवार) आधीच वेगळ्या वाटेवर गेले आहेत आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वात परदेश दौऱ्यावरही गेल्या आहेत.”

“त्यामुळे हे सगळे पुढे महाविकास आघाडीत राहतील, हे मान्य करणं अवघड आहे. पुढचं राजकारण वेगळ्या स्वरूपात समोर येईल, त्याची तयारी ठेवावी लागेल,” असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.