हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार, दोषी वाचू शकत नाही, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी
नांदेड : “वैष्णवीची आत्महत्या नव्हे, ती हत्याच आहे,” असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी कितीही मोठा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसणारा असो आम्ही वैष्णवीला न्याय मिळवूनच देऊ. हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. इथे कोणताही दोषी वाचू शकत नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. ( This is Devendra Fadnavis government the guilty cannot be spared Chitra Waghs warning in Vaishnavi Hagavane suicide case)

पिंपरीतील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीचा मृत्यू आत्महत्या असल्याचा प्राथमिक दावा पोलिसांकडून करण्यात आला असला, तरी तिच्या कुटुंबीयांनी हा खून असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते असून, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळत आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, “वैष्णवीच्या मृतदेहावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा होत्या. तिच्यावर दीर्घकाळ शारीरिक आणि मानसिक छळ झाला. हे केवळ आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे प्रकरण नाही, ही थेट हत्या आहे. लग्नानंतर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर अत्याचार करण्यात आले.”

वैष्णवीचा नवरा आणि काही सासरचे नातेवाईक सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत असून, तिचा सासरा आणि आणखी एक नातेवाईक फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत आहेत.

वाघ पुढे म्हणाल्या, “वैष्णवीला हुंड्यासाठी त्रास देण्यात आला. सोनं, चांदी, गाडी यांची मागणी झाली होती. एवढंच नाही तर तिची आई सतत त्रासाबद्दल सांगत होती, तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. जर पोलिसांनी वेळेवर लक्ष दिलं असतं, तर आज वैष्णवी आपल्यात असती.”

वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या मुलाचा उल्लेख करत वाघ म्हणाल्या, “या चिमुकल्याच्या डोळ्यांसमोरून आई गेली, हे आपल्याला अस्वस्थ करणारं आहे. समाज म्हणून आपण कुठे जात आहोत? २१व्या शतकात मुलींना अजूनही हुंड्यासाठी मरण स्वीकारावं लागतं, हे अत्यंत लाजिरवाणं आहे.”

वाघ यांनी राज्य सरकारकडे विशेष जलदगती न्यायालयात या प्रकरणाचा खटला चालवण्याची मागणी केली असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी भाजप महिला आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.

“वैष्णवी ही केवळ तिच्या आई-वडिलांची नाही, ती महाराष्ट्राची लेक आहे. तिच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धारही वाघ यांनी व्यक्त केला.