कुंभमेळ्यात आता ‘शाही’ नव्हे तर ‘अमृत स्नान’; नाशिक कुंभमेळ्यासाठी सरकारचा ऐतिहासिक ठराव

विशेष प्रतिनिधी

नाशिक : कुंभमेळ्यातील प्रमुख धार्मिक विधीला ‘शाही स्नान’ न म्हणता आता ‘अमृत स्नान’ म्हणून संबोधले जाणार आहे. महंत राजेंद्र दास महाराज यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने यास मान्यता दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला.
( Now not Shahi butAmrit Snan at Kumbh Mela Governments historic resolution for Nashik Kumbh Mela)

ही बैठक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील १३ अखाड्यांच्या प्रमुख साधू-संतांच्या उपस्थितीत झाली. यावेळी महंत मंडळींनी अमृत स्नान ही संकल्पना मांडली. बैठकीत उपस्थित सर्व साधूंनी या निर्णयाचे एकमुखाने स्वागत केले.

नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामकुंड येथे ध्वजारोहणाने सुरू होईल आणि २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावरोहणाने समाप्त होईल. तब्बल २२ महिने चालणाऱ्या या महाकुंभ पर्वात ४२ ते ४५ पर्व स्नानांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाचा कुंभ “त्रिखंडी कुंभ” असून गुरू ग्रह सिंह राशीतून तीन वेळा मार्गक्रमण करणार आहे, ही खगोलीय घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनुसार, नाशिकमध्ये एकूण तीन अमृत स्नान होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 ला नाशिकमधील पंचवटी येथे असलेल्या रामकुंड या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होईल. त्यानंतर या कुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्या या दिवशी होईल. त्यानंतर या कुंभमेळ्यातील दुसरे अमृत स्नान हे श्रावणातील अमावस्येला म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 ला होईल. त्यानंतर तिसरे अमृत स्नान हे 11 सप्टेंबर 2027 या दिवशी होईल. 24 जुलै 2028 ला सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वज अवतरण होईल, म्हणजेच या कुंभपर्वाची समाप्ती होईल.

या 22 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 42 ते 45 पर्व स्नान होणार आहेत. यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे. कारण गुरू हा तीन वेळा सिंह राशीतून मार्गस्त होऊन पुन्हा परतणार आहे. याच कालावधीत उज्जैन येथेही कुंभमेळा होणार आहे.

 

ही तीन अमृत स्नानं रामकुंड, त्र्यंबकेश्वर आणि इतर कुंभस्नान स्थळी पार पडणार आहेत. ही सर्व महत्त्वाची स्नाने लाखो भाविक, साधू-संत, नागा आणि प्रवासी यांची उपस्थिती अनुभवणार आहेत.

या बैठकीत नाशिकमध्ये १५०० एकर जागा कायमस्वरूपी साधुग्रामसाठी अधिग्रहित करण्याच्या निर्णयावरही चर्चा झाली. यामुळे दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनात स्थैर्य व सुविधा वाढणार आहेत.

गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची चर्चा या बैठकीत झाली. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर पर्यावरणीयदृष्ट्याही गोदावरीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जातील.

मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे हेही या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित होते. यामध्ये १० शैव अखाड्यांचे २० महंत आणि ३ वैष्णव अखाड्यांचे ६ महंत सहभागी झाले होते.