विशेष प्रतिनिधी
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे मराठा समाजातील लग्न व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत शेकडो प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यावर पिंपरी-चिंचवड सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक होऊन मराठा समाजाच्या लग्न कार्यात यापुढे आचारसंहिता लागू करण्यावर सर्वानुमते एकमताने निर्णय घेण्यात आला. लग्नानंतर मुलीचा छळ, मानसिक त्रास देणा-या कुटूंबाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
( Maratha community now has code of conduct in wedding functions)
पुण्यातील सकल मराठा समाजाने लग्न व्यवस्थेबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाकडून लग्न व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी एकत्र बैठक घेत काही अटी व नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लग्न समारंभात मुला-मुलीचे दोन्ही पालकांनी सजग राहून सामोपचाराने निर्णय घेणे आवश्यक आहे. लग्नातील अनावश्यक खर्चावर निर्बंध आणणे, मान्यवरचे सत्कार सोहळे रद्द करणे, लग्न वेळेवर लावणे, प्री-विडिंग, डेस्टी नेशन, जेवणावळी, मानसन्मानावर मर्यादा घालण्यासंदर्भात आवश्यक चर्चा घडवून आणत लग्न व्यवस्थेची एक आचारसंहिता आणि काही नियम-अटी घालणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले.
यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, विलास लांडे, संजोग वाघेरे पाटील, सुरेश भोईर, नाना काटे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे प्रमुख सतीश दरेकर, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र कुंजीर, पुणे शहर समन्वयक सचिन आडेकर, अनिल तागडे, रोहिदास कोंडे, सचिन साठे, अतुल शितोळे, एन बी भोंडवे, मधुकर मास्तर चिंचवडे, धोंडीबा भोंडवे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अशी असेल लग्न व्यवस्थाची आचारसंहिता
मुलांच्या लग्नापूर्वी त्यांच्याशी आई-वडिलाचा खुलेपणाने संवाद व्हावा. आवश्यक तसे वातावरण कुटुंबात तयार करणे, ही आई-वडिलांनी खबरदारी घ्यावी.
– मुला-मुलीची लग्न वेळेवर लावावीत.
– ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ, मानसिक त्रास होतो, त्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार करणार नाही.
– लग्न समारंभात सत्कार सोहळे बंद व्हावेत, ज्यांना करायचे त्यांनी लग्नानंतर थोडक्यात करावेत.
– स्टेजवरील गर्दी कमी व्हावी, मिरवणुकांना आवर घालावा, स्वागत समारंभाला प्राधान्य द्यावे.
– अनावश्यक खर्च टाळावेत. लग्न साधेपणाने व्हायला पाहिजे. स्वागत समारंभ व आशीर्वाद एकच व्हावेत.
– औक्षण करताना सुवासिनीची व गंध लावतांना मान्यवरांची संख्या मर्यादित असावी.
– मुलींच्या संसारामध्ये आई – वडिलांचा हस्तक्षेप नसावा.
– मुलीवर अन्याय होत असेल तर मुलीच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे.
– दशक्रिया विधी / अंत्यविधी याबाबत श्रद्धांजली एक ग्रामस्थ / एक मान्यवर
– देणगी पाकिटे पुकारताना मर्यादा असावी.
