विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. मात्र या एकत्र येण्याने भारतीय जनता पक्षाला कुठलाही धोका नाही, असा ठाम विश्वास भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
( BJP is the largest party in the worldit will not make a difference even if the Thackeray brothers come togetherPankaja Munde firmly believes)
पंकजा मुंडे म्हणाल्या, “भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आली आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या नेतृत्वाखाली युती सरकार आहे. अशा पक्षाला दोन नेते एकत्र येतात म्हणून काही फरक पडत नाही.”
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी असेही सांगितले की, “महायुती सरकार हे विकासाभिमुख सरकार आहे. महापालिका निवडणुका असोत, की विधानपरिषद किंवा स्थानिक संस्था आम्ही सर्व ठिकाणी जनतेसमोर आमच्या कामगिरीसह जाणार आहोत.”
“ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही, हे बाजूला ठेवा. पण जनता हा निर्णय पाहून भुलणार नाही. जनतेने याआधीही विश्वास भाजपवर दाखवला आहे आणि पुन्हा दाखवेल,” असं त्या ठामपणे म्हणाल्या.
“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही महत्त्वाचे नेते आहेत. पण त्यांचा एकत्र येण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा आणि व्यक्तिगत राजकारणाचा विषय आहे. भाजपने मात्र आपल्या विकासाच्या अजेंडावर ठाम राहून जनतेचा विश्वास संपादन केला आहे, असे मुंडे म्हणाल्या.
शिवसेना (उद्धव गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील युतीच्या शक्यतेने मुंबई महापालिकेच्या राजकारणात घडामोडी वाढवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत “लवकरच मोठी बातमी देतो” असे सूचित केल्याने हा राजकीय चर्चेचा उगम ठरला.
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते. २५ वर्षे शिवसेनेने सत्ता गाजवली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सेनेत फूट झाल्याने त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या चर्चेवर उपरोधिक प्रतिक्रिया देत भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी तुळजापूर येथील एका कार्यक्रमात म्हटलं, “उद्धव ठाकरेंकडे २० आमदार, तर राज ठाकरेंकडे शून्य. आणि आम्हाला म्हणे त्यांचं एकत्र येणं झोप उडवणार आहे! एवढी ‘शक्ती’ पाहून आम्हाला घाम फुटतो!”शिवसेनेचा खरा ब्रँड म्हणजे हिंदुत्व. ते सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाला. आता ही युती म्हणजे एका वैचारिक दिशाहीनतेचं उदाहरण आहे.
