लपवण्यासारखे काही नसेल तर लेखात उपस्थित प्रश्नांची उत्तरे द्या, राहुल गांधी यांची निवडणूक आयाेगाकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर माझ्या लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि ते सिद्ध करा, असे आव्हान देत मतदान केंद्रावरील सायंकाळी पाच नंतरचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावेत, अशी मागणी काॅंग्रेस नेते तसेच लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी विविध वृत्तपत्रांत लेख लिहून 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, प्रिय निवडणूक आयोग, तुम्ही एक संवैधानिक संस्था आहात. गंभीर प्रश्नांना उत्तर म्हणून स्वाक्षरीशिवाय अस्पष्ट नोट्स जारी करणे हा योग्य मार्ग नाही. जर तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल, तर माझ्या लेखात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि ते सिद्ध करा.

अलिकडच्या काळात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राज्यांमध्ये खासकरून महाराष्ट्रात डिजिटल, मशीन रीडेबल मतदार याद्या प्रकाशित कराव्यात. तसेच महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी 5 नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी म्हणाले की, “टाळाटाळ केल्याने विश्वासार्हता टिकून राहणार नाही. सत्य सांगितल्यानेच ती दृढ होईल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

विविध भाषांतील वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या लेखामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. आपण सांगोवांगी माहिती बाजूला ठेवली तरी, अधिकृत आकडेवारीवरून संपूर्ण खेळ उघड होतो. 2024च्या विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या 149 जागांपैकी भाजपाने 132 जागा जिंकल्या. म्हणजेच 89 टक्के स्ट्राइक रेट होता. कोणत्याही निवडणुकीतील त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी होती, तर पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा स्ट्राइक रेट फक्त 32 टक्के होता, याकडे त्यांनी लक्ष वेधत, या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रकरण गंभीर नसते तर तो एक चांगला विनोद मानला असता, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेदेखील उत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीवर केलेले आरोप निराधार असून हा कायद्याच्या राज्याचा अपमान असल्याची टीका निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात सर्व तथ्ये स्पष्ट केली आहेत आणि ती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. तथापि, वस्तुस्थितीकडे कानाडोळा करून असे मुद्दे पुन्हा पुन्हा उपस्थित केले जात असल्याचे आयोगाने सुनावले आहे. कोणाकडूनही पसरवलेली कोणतीही चुकीची माहिती ही कायद्याचा अनादर करण्याचेच द्योतक आहे. तसेच, विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी ही बाब आहे. अशा चुकीच्या माहितीमुळे निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचते. मतदारांनी प्रतिकूल निर्णय दिल्यावर निवडणूक आयोगाशी हातमिळवणी झाली आहे, असे सांगून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न पूर्णपणे तथ्यहीन आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे.