शरद पवार यांची ‘ऑपरेशन सिंदूर’वरील भूमिका: इंडिया आघाडीतील विसंवादाचे संकेत?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. काँग्रेस पक्ष आणि खास करून राहुल गांधी यांनी या विषयावर खुली चर्चा व्हावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मागणीबाबत सावध भूमिका घेत ही मागणी प्रत्यक्षात फेटाळली नसली तरी तिला उघड पाठिंबा नोंदवलेला नाही. ( Sharad Pawars stance on Operation Sindoor Signs of discord within the India Front?)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिकात प्रकाशित झालेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणतात, “विशेष अधिवेशनाला माझा विरोध नाही. पण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे त्यावर संसदेत खुली चर्चा होणं योग्य नाही. याआधी अशा काही घटना घडल्या आहेत, त्यावेळी संरक्षणमंत्र्यांनी काही लोकांना बोलावून खाजगीत माहिती दिली होती. यावेळीही सरकारने निवडक खासदारांना बोलावून स्पष्ट माहिती द्यावी, हे अधिक योग्य ठरेल.”

यामधून पवारांनी सूचित केलं की सरकारने “नेमकं काय घडलं, काय धोरण राबवलं याची माहिती खासगी स्वरूपात द्यावी. म्हणजेच विशेष अधिवेशनात खुली चर्चा झाल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांना वाटते.

शरद पवार यांनी म्हटले आहे की,ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती मिळण्याकरता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय. मात्र, अशा विशेष अधिवेशनाची गरज नाही. विशेष अधिवेशनाला माझा विरोध नाही. पण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर खुली चचर्चा होऊ शकत नाही. याच्या आधी एक दोनवेळा असे प्रकार झाले आहेत. त्यावेळी संरक्षणमंत्र्यांनी मला आणि काह लोकांना बोलावलं, काय प्रकार झाला याची माहिती दिली कारण, त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. नेमकं काय घडलंय हे सरकारने विशेष अधिवेशनात सांगावं अशी सर्वांच अपेक्षा असणार, पण याबाबतीत बोलण्यावर मर्यादा येतील विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही. पण त्यापेक्षा दहा- वीस लोकांना बोलावून यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं पाहिजे काय स्थिती आहे, आपण काय केले आहे याची माहिती दिली पाहिजे.

दुसरीकडे, काँग्रेसचे नेते आणि इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेतृत्व असलेले राहुल गांधी सातत्याने या विषयावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, भारतातील नागरिकांना आणि विरोधकांना “ऑपरेशन सिंदूर” बाबत संपूर्ण माहिती मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांची मांडणी ही काँग्रेसच्या भूमिकेपासून स्पष्टपणे वेगळी आहे, आणि त्यामुळे इंडिया आघाडीतील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे राहुल गांधी सरकारवर आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या घटक पक्षातील वरिष्ठ नेते शरद पवार संयमित आणि प्रशासनाशी सहकार्य करणारी भूमिका मांडत आहेत.

या मतभिन्नतेमुळे ‘इंडिया’ आघाडीत रणनीतीवर एकवाक्यता आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय, शरद पवार यांचा सुरक्षाविषयक अनुभवादेखील त्यांच्या भूमिकेला वजन देतो, हे नाकारता येणार नाही. त्या तुलनेत राहुल गांधी यांना सुरक्षा धोरणाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांची मागणी गांभीर्याने घेतली जात नाही.