विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. ( If the bridge was dangerouswhy wasnt there a complete ban on entry Raj Thackeray questions the government)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल गर्दी जास्त झाल्याने कोसळला आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्यापही काही पर्यटक बेपत्ता आहेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंद्रायणी पूल दुर्घटनेसंदर्भात म्हटले आहे की, लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवे. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असे नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवे.
आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साचणे, रस्त्यांची चाळण होणे, पूल पडणे अशा घटना सुरू झाल्या आहेत. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावे.” असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरते बोलायचे झाले तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असे काही नियोजन करता येत नाही? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचे नियोजन करून प्रशासनाकडून कामे करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग, पण राज्याला काय उपयोग?” असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाही. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
