विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार अशी चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले माजी सभापती अजित गव्हाणे आणि त्यांच्यासह ३९ पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वगृही परत येत आहेत.
( Sharad Pawar Fraction suffers blow 39 office bearers under Ajit Gavanes leadership join Ajit Pawars NCP again)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे या पक्ष प्रवेशाच्यानिमित्त अंकुशराव लांडगे सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित राहणार आहेत. अजित गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांसह काही भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही पक्ष प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तर सकाळी ११ वाजता खासदार शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी ताथवडे येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या पक्ष प्रवेशाबाबत ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सद्या भोसरी विधानसभेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आणि हिंदुत्ववादी आमदार अशी राज्यभर ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेले हॅट्रिक आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे. अजित गव्हाणे यांनी आमदार लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढून त्यांना जोरदार टक्कर दिली होती. महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष हे जरी सत्तेत एकत्रित असले तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पदाधिकारी स्वतंत्र निवडणूक लढण्यात जास्त इच्छुक आहेत अशी चर्चा पिंपरी चिंचवड च्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष आपला पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भोसरीतील (त्यावेळीचे भाजपचे सहयोगी सदस्य) आमदार महेश लांडगे यांच्या साथीने एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी चिंचवड महालिकेतील २५ वर्षाची सत्ता नेस्तनाबूत केली होती. त्यावेळी अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करीत होते. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने त्यांनी पुन्हा मोट बांधण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांना कॅबिनेट दर्जा असणारे विधानसभा उपाध्यक्ष पद देत राष्ट्रवादी काँग्रेस ला शहरात ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. जे पक्षापासून बाजूला गेले होते त्यांना पुन्हा सक्रिय करून त्यांच्यावर ही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे अजित पवार यांच्याशी जुळलेले संबंध ही त्याचाच एक भाग आहे. त्यांच्या माध्यमातूनच भोसरीमध्ये हा मोठा पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी अजित गव्हाणे यांनी १७ जून २०२४ ला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह ३९ पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला होता. आता पुन्हा ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वगृही परतण्यासाठी १७ जून २०२५ ही तारीख अंतिम केली आहे.
