विशेष प्रतिनिधी
पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये मोठे परिवर्तन होत आहे. वाढवण बंदर जगातील 10 सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असणार आहे. यामुळे भारताला सागरी शक्ती बनवण्याची संधी प्राप्त झाली आहे. या माध्यमातून जागतिक व्यापारात देशाची भागीदारी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
( Vadhan Port will be included in the top 10 ports of the world 10 lakh employment opportunities Chief Ministers information)
पालघर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एकट्या पालघरमध्ये 10 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. यात भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या वाढवण बंदरामुळे ज्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत. त्या संधीसाठी तरुणांना तयार करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर त्यांना व्यवसाय करण्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात काहींना सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले, काहींना धनादेश प्रदान करण्यात आले, परंतु हजारो तरुणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण आपण या ठिकाणी देणार आहोत. यासाठी जीएसडब्ल्यू स्टील, ओनिडा आणि महिंद्रा सारख्या देशातील सर्वात नामांकित कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत.
सुमारे 57 कंपन्यांसोबत कौशल्य विकासाचे आणि अप्रेंटिसचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स मध्ये देखील ट्रेनिंग देण्याच्या कराराचा समावेश आहे. देशातला पहिला क्रेन ऑपरेटर कोर्स हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण सुरू केलेला आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील तरुणांना या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘बांबू मिशन’ हे आणखी एक मोठे मिशन याठिकाणी सुरू करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या जीवनामध्ये बांबू मिशन मार्फत समृद्धी आणणे शक्य आहे. यामार्फत पर्यावरणाच्या संरक्षणासोबत सामान्य शेतकर्याच्या जीवनात समृद्धी आणली जाणार आहे.
