भाजपचे सरकार आणण्यात शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा, शिवनेच्या केंद्रीय मंत्र्यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा: शरद पवार यांनी वेळोवेळी भाजपला मदत केली आहे. राज्यात भाजपचे सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ( Sharad Pawars role in bringing BJP government is not a lions share but an elephantsclaims Shiv Senas Union Minister)

बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे आता या देशात मी कसा मोठा विरोधक आहे. हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण 2014 साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे. मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का? तर देशात सर्वात मोठा विरोधक मी व माझा पक्ष, हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
राज्यात 2014 साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष वेगळे लढले होते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली होती. त्यावेळी भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते, त्यामुळे भाजप आणि शिवसेना याना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यावेळी शरद पवार यांनी भाजपला न मागताच बिनशर्त बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. त्यामुळे शिवसेनेला बाजूला ठेऊन भाजपला सरकार स्थापन करणे आणि चालविणे शक्य झाले.