विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा, जागतिक मंचावर त्यांची उपस्थिती आणि नेतृत्वक्षमता ही भारतासाठी एक अमूल्य संपत्ती आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस खासदार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनी कौतुक केले आहे. (Prime Minister Narendra Modis leadership is an invaluable asset for India highly praised by Shashi Tharoor)
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत एका इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थरूर यांनी भरभरून कौतुक केले आहे. यामुळे थरूर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या शक्यतेवर थरूर यांनी पूर्णविराम देत म्हटलं आहे की, “हे माझ्या भाजपमध्ये जाण्याचे संकेत नव्हते, तर भारताच्या राष्ट्रीय एकतेचं प्रतीक होतं. ही भूमिका मोदींच्या किंवा भाजपच्या समर्थनाची नव्हे, तर भारताच्या परराष्ट्र धोरणातील एकतेची आणि लोकशाहीतही ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना बाळगणाऱ्यांची होती.
थरूर यांनी लिहिलेल्या लेखात ‘ऑपरेशन सिंदूर’ या भारताच्या बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय संवाद मोहिमेचं वैशिष्ट्य सांगताना म्हटलं होतं की, “ही मोहीम केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर देशाच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत जगासमोर एकजुटीने दिलेला संदेश होता.” थरूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधी मंडळाने पनामा, गयाना, कोलंबिया, ब्राझील आणि अमेरिकेला भेटी दिल्या. त्यांनी परराष्ट्र नेत्यांना भारताची भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर ठाम भूमिका मांडली.
रशियातील मॉस्को येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत थरूर यांनी सांगितलं, “मी २५ वर्ष संयुक्त राष्ट्रसंघात काम केलं. तिथून भारतात परत येण्यामागे कारण होतं देशासाठी काम करणं. मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नाही. मी फक्त भारतासाठी उभा आहे. अमेरिकेतील एक जुना सिद्धांत आहे — ‘पाण्याच्या काठावर राजकीय मतभेद संपतात’. भारतातही आपण अशीच भूमिका घ्यायला हवी. परराष्ट्र धोरण म्हणजे कोणत्याही पक्षाचं धोरण नसतं. ते संपूर्ण राष्ट्राचं धोरण असतं.”
गेल्या आठवड्यात थरूर यांनी मान्य केलं होतं की काँग्रेसच्या काही नेत्यांशी वैचारिक मतभेद आहेत. मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “माझं काँग्रेसवरील प्रेम, मूल्यांवरील निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी असलेली बांधिलकी अजूनही कायम आहे. मी भाजपच्या बाजूने झुकत आहे असं मानणं चुकीचं आहे. मी जे काही लिहिलं किंवा केलं ते देशहिताच्या दृष्टीने होतं. पंतप्रधानांचा उल्लेख ‘राष्ट्रीय नेतृत्व’ म्हणून केला होता, पक्षीय संदर्भात नाही.”
थरूर यांनी लिहिलेला लेख ‘द हिंदू’ या प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे, तो लेख पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत X हँडलवरूनही शेअर करण्यात आला. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता अधिक वाढली असून पक्षांतर्गत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर थरूर म्हणाले, एकच गोष्ट अनेकदा बोलतोय — माझं मत हे कायम भारताच्या व्यापक हिताशी जोडलेलं आहे.”
