दहशतवादी केंद्रं सुरक्षित नाहीत, भारत कारवाईस मागे-पुढे पाहणार नाही, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

विशेष प्रतिनिधी

शांघाय : चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा कठोर शब्दांत हल्ला चढवला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी थेट चीनच्या भूमीतून पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “दहशतवादी केंद्रं कुठे आहेत हे आम्ही जगाला दाखवून दिलं आहे आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी भारत कधीही मागे-पुढे पाहणार नाही. आता ही केंद्रं सुरक्षित राहिलेली नाहीत हे त्यांना लक्षात घेतलं पाहिजे.” ( Terrorist camps are not safeIndia will not hesitate to take action Defence Minister Rajnath Singh warns Pakistan)

सिंह म्हणाले, “आमच्या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि विश्वास या सर्वांत मोठी आव्हानं आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे अतिरेकी विचारधारा, वाढता कट्टरतावाद आणि प्रायोजित दहशतवाद. दहशतवादी गटांना जाणीवपूर्वक खतपाणी घालणाऱ्या आणि त्यांच्या माध्यमातून संकुचित स्वार्थ साधणाऱ्या देशांना आता परिणाम भोगावेच लागतील.”

या बैठकीत भारताने यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे देखील चर्चेचा विषय ठरले. याच माध्यमातून भारताने सीमापलीकडील दहशतवादी तळांवर निशाणा साधत स्पष्ट केलं की, भारत आता “डिटरन्स” नाही तर “डायरेक्ट अ‍ॅक्शन”च्या धोरणावर आहे. या पार्श्वभूमीवर सिंह यांनी पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता तो कोणत्या देशाचा ‘नजीकचा मित्र’ आहे हे दाखवत चीनसमोरच पाकिस्तानची दुटप्पी भूमिका उघड केली.

राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं की, “जे देश अजूनही दहशतवाद्यांना राजकीय फायद्यासाठी आश्रय देत आहेत, त्यांनी समजून घ्यावं की ही दुटप्पी भूमिका आता जग झेलणार नाही. शांघाय सहकार्य संघटनेनं अशा देशांचा निःसंशय निषेध केला पाहिजे आणि दहशतवादविरोधात एकसंध भूमिका घेतली पाहिजे.”

“दहशतवादाविरोधात भारताची भूमिका केवळ घोषणांपुरती नाही, ती कृतीप्रधान आहे,” असं सांगत राजनाथ सिंह म्हणाले की, “भारत आपल्या सुरक्षा हितांच्या संरक्षणासाठी आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कोणतीही निर्णायक कारवाई करण्यास कचरत नाही. शांततेचा पुरस्कार करताना भारत आपला आत्मरक्षणाचा हक्कही समर्थपणे बजावत राहील.”