विशेष प्रतिनिधी
मुंबई : मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी सुद्धा असेच झाले होते. सरकारने मराठी माणसाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला आणि मराठी व अमराठी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ( The governments coercion lost to the power of the Marathi people alleges Uddhav Thackeray)
हिंदीच्या कथित सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चाचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीबाबतचे दोन्ही शासकीय आदेश ( जीआर) रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा हिंदी भाषेला नाही, सक्तीला विरोध होता. आज आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांना कल्पना नव्हती की मराठी माणूस एकवटेल. आता मोर्चा होऊ नये म्हणून जीआर रद्द केला. हा कोणी जीआर काढला होता. भाजप म्हणजे खोट्यांची फॅक्टरी झाली आहे.
ठाकरे म्हणाले, एखादे संकट येईपर्यंत आपण का एकत्र येत नाही? 5 तारखेला आम्ही मोर्चा काढणार होतो, पण आता विजयी सभा आम्ही काढू. कुठे कशी सभा असेल याबाबत आम्ही माहिती देऊ. आपण सक्तीच्या विरोधात एकत्र आलो होतो, आता यांनी निर्णय रद्द केला आहे. पण आपण सगळे एकत्र येऊ , कुठे यायचे ते लवकरच कळेल.
उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा माशेलकर समिती नेमली होती तेव्हा उदय सामंत शिक्षणमंत्री होते. यात प्राथमिक माहिती कोणीच घेतली नव्हती. हा अहवाल मंत्रिमंडळात सादर झाला, त्यानंतर एक अभ्यास मंडळ नेमले गेले आणि पुढे सरकार पाडले गेले. त्यामुळे आम्ही जीआर काढलेला नाही, हा त्यांनीच काढलेला जीआर होता. मी काढला असता तर 3 वर्ष झोपले होते का?
एकनाथ शिंदे तर लाचार आहेत, त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करायची आहे. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतात. उलटे मी अजित पवारांचे कौतुक करतो, ते बोलले तरी. पण हे शिंदे कुठे बोलले? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचे कौतुक केले. 5 तारखेला सर्वानी एकत्र यायला पाहिजे. मनसेने देखील एकत्र यायला पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, एखादे संकट आल्यानंतर एकत्र कशाला यायचे. आपण आधीच एकत्र राहिलो तर संकट येणारच नाही.
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. परंतु आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या प्रांताच्या अनुसार तिथल्या मातृभाषेला सर्वोच्च मान दिलाच पाहिजे. तसेच महाराष्ट्रात मराठीला मान मिळलाच पाहिजे. मराठी अमराठी गुण्यागोविंदाने नांदत होते, यांनी दोघात खडा टाकला, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
