विशेष प्रतिनिधी
मुंबई: पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन आदेश ( जीआर) रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे. ( Hindi compulsion was abolished due to the Marathi peoples vote Raj Thackeray congratulated)
राज ठाकरे यांनी ट्विट करत महायुती सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय रद्द केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! ! हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. तसेच मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मराठी माणसाचा विजय आहे. मराठी माणसाच्या दबावापुढे सरकार झुकले आहे. मराठी माणूस एकत्र आला तर काय होऊ शकते. हा संदेश जायचा होता तो देशात गेला आहे. आताच्या सरकारने जीआर काढला होता. तो रद्द करणे गरजेचे होते. मराठी माणसाच्या एकजुटीने हा रद्द झाला आहे. राज ठाकरेंनी या सर्व गोष्टी देशासमोर मराठी माणसासमोर ठेवल्या. मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाला आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबईतील वरळीच्या रस्त्यावर मराठी जनता व मनसे कार्यकर्ते जमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला.
