विशेष प्रतिनिधी
मुंबई : रायगडच्या पायथ्याशी निजाम आला कोठून? असा सवाल करत आदिलशाह, निजामशाह, मुघलाच्या सर्व खुणा या पुसल्या पाहिजेत. रायगड ही ग्रामपंचायत निजामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असेल तर आम्हाला मान्य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगड वाडी असं करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. ( Gopichand Padalkar demands to erase all traces of NizamAdil ShahNizam ShahMughals at the foot of Raigad)
आमदार पडळकर यांनी नुकताच स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडचा दौरा केला. याबाबत ते म्हणाले, “रायगड किल्ला हा अखंड हिंदुस्तानातल्या लोकांसाठी उर्जास्थान आहे. याचं किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षे वास्तव्य केले होते. असं असताना हा किल्ला ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव हे छत्र निजामपूर असं आहे. या समुह ग्रामपंचायतीमध्ये 12 लहान वाड्या देखील आहेत. रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून? औरंगजेब, निजाम आम्हाला नकोय, निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या? त्यामुळे या गावाचे नाव बदलायला हवे. येथील ग्रामस्थांचीही हीच मागणी आहे.
पडळकर म्हणाले, रायगड किल्ल्याची जी काळजी पूर्वी घेतली गेली, ती धनगर समाजानेच घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे १६८० साली आणि संभाजी महाराजांचे १६८९ साली निधन झाल्यानंतर रायगडावरील जगदेश्वर मंदिर व इतर ठिकाणांची देखभाल धनगर समाजाने केली. मात्र, आज या समाजाला अतिक्रमण केलं असल्याच्या नोटीसा दिल्या जात आहेत, हे दुर्दैवी आहे.
