महाराष्ट्रदेशीचा राजकीय भवताल प्रायः सत्ताकेंद्रित वाद-वादळांच्या परिघातच फिरत असतानाच्या वर्तमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाला उजाळा देणारी आणि नव्या पिढीला त्यांच्या मुळांशी जोडणारी एक वेगळी वाट निवडण्याचे स्तुत्य पाऊल उचलले आहे. आषाढी एकादशीचे विशेष औचित्य साधत फडणवीस यांनी प्रारंभ केलेला ‘महाराष्ट्रधर्म’ हा पॉडकास्ट म्हणजे वैचारिकतेची गुढी उभारणारी नवी ‘वारी’ ठरावी! इतिहासात, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये महाराष्ट्र ही देवभूमी, संतभूमी, वीरभूमी म्हणून गौरविली गेली आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाच, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारा ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट नव्या पिढीची नाळ मराठी मातीत रूजलेल्या जीवनमूल्यांशी नक्कीच जोडेल! महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला एक अनन्यसाधारण उंची प्रदान केली आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग यांची करून दिलेली उजळणी देशाचे बनविण्यासाठी साहाय्यभूत ठरेल. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेले हे स्मरणरंजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वप्रतिमेच्या प्रेमातील असल्याचा राजकीय आरोप बाजूला सारत या प्रयत्नांमागील सामाजिक भान तेवढे ध्यानी घेतले पाहिजे.
रयतेशी असणारा सुसंवाद हे कोणत्याही राजकीय नेत्याचे खरे कौशल्य ! संवाद साधण्याचे माध्यम कोणतेही असले तरी त्यातून नेत्याचा प्रवास घडत असतो. भारतातील राजकीय नेत्यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी वेळोवेळी रेडिओ, टेलिव्हिजन, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर केला आहेच. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कविता आणि भाषणांद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यांनी रेडिओ आणि टेलिव्हिजनचा वापर केला; तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पारंपरिक माध्यमांचाच वापर केला. इंदिरा गांधी यांनीही विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रेडिओ आणि टेलिव्हिजनचा वापर करीत जनतेशी राजकीय आणि प्रशासकीय संवाद साधला. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमाने तर एक वेगळा वैश्विक इतिहास घडविला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर जनतेशी थेट संवाद साधतात. लोकांना प्रेरणा देणे, सामाजिक जागरूकता वाढवणे आणि सरकारच्या योजनांचा प्रचार करणे हा ‘मन की बात’चा मुख्य उद्देश चांगलाच सफल झाल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्टची संकल्पना समजून घेतली पाहिजे. ‘महाराष्ट्रधर्म’ हे नावच मुळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचे प्रतीक आहे. हे नाव निवडून फडणवीस यांनी या पॉडकास्टचा उद्देश स्पष्ट केला आहे! पॉडकास्टच्या पहिल्या भागात रामायण, महाभारत, भगवान गौतम बुद्ध यांचे संदेश आणि संत परंपरेच्या योगदानावर गहन चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा केवळ ऐतिहासिक घटनांपुरती मर्यादित नसून, ती आजच्या काळातील सामाजिक आणि नैतिक मूल्यांशी जोडली गेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची महती सांगत संत परंपरा ते समाजसुधारकांचे प्रगतशील पुरोगामी विचारांची पालखी वाहणे हाच ‘महाराष्ट्रधर्म’ असल्याचे पुरते स्पष्ट केले आहे. ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही, ती एक जिवंत मूल्यसंहिता आहे. विवेकाने विचार करा, सेवाभावाने वागा आणि शौर्याने उभे राहा’, असे ही संहिता सांगते. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत, फुलेंच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहिली. ‘महाराष्ट्रधर्म’ म्हणजे स्मरणरंजन नाही. आपले नैतिक मार्गदर्शक कोण, आपण कोण आहोत, हे समजून घेऊन आपल्याला काय घडवायचे ते ठरवणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे, अशी यथार्थ आणि अभ्यासपूर्ण मांडणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसे करताना त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांना सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधण्याचा प्रयास केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे केवळ एक राजकीय नेते आणि प्रशासकच नाहीत, तर एक विचारवंत आणि प्रभावी वक्ते देखील आहेतच ! ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचा एक वेगळा पैलू दाखवला आहे. राजकीय नेत्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा असते. परंतु, फडणवीस यांनी या पॉडकास्टद्वारे सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीदेखील सहर्ष स्वीकारली आहे. ‘महाराष्ट्रधर्म’ पॉडकास्टची सुरुवात ही केवळ एका मालिकेची सुरुवात नाही, तर एका सांस्कृतिक चळवळीचा प्रारंभ आहे. भविष्यात या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पैलूंवर चर्चा होईल, त्यामुळे लोकांना त्यांच्या राज्याच्या गौरवशाली वारशाची अधिक सखोल माहिती मिळेल. याशिवाय, या पॉडकास्टच्या माध्यमातून सामाजिक जागरूकता, शिक्षण आणि सांस्कृतिक एकतेचे नवे पर्व सुरू होण्याचा नवा मार्गही सापडेल! या पॉडकास्टचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो देशभरातील आणि परदेशातील मराठी भाषिक आणि भारतीय संस्कृतीत रस असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेला जागतिक व्यासपीठ मिळेल, असे आशादायी चित्र निश्चितच दिसते !
