विशेष प्रतिनिधी
मुंबई : परदेशी ड्रग्स तस्कर विशेषतः नायजेरियन भारतात राहण्यासाठी किरकोळ गुन्हे करण्याची चालबाजी करतात. मात्र आता ही चालबाजी चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा निर्णय जाहीर करत सांगितले की, नायजेरियासारख्या काही देशांतील ड्रग्ज तस्कर भारतात येऊन जाणीवपूर्वक किरकोळ गुन्हे करतात, जेणेकरून त्यांच्यावर प्रत्यार्पणाची कारवाई टाळता येईल. मात्र आता अशा किरकोळ गुन्ह्यांना माफ करून थेट प्रत्यार्पण करण्यासाठी राज्य सरकार कार्यपद्धती निश्चित करत आहे. ( Foreign Drug Traffickers Tricks Wont Work AnymoreMinor Offences to Be Waived for Immediate Deportation)
छत्रपती संभाजीनगरमधील एका विद्यार्थिनीच्या ड्रग्जच्या आहारी गेल्याच्या प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितले की, विद्यार्थिनीचा ताबा तिच्या आईकडे देण्यात आला असून समुपदेशनाची कार्यवाहीही पूर्ण झाली आहे. तसेच शहरात अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे (पूर्व) मतदारसंघात ड्रग्ज तस्करी आणि विक्री वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी यावर पुरेशी कारवाई न केल्याचाही आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी विविध विभागांच्या समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
ड्रग्ज तस्करांकडून बालकांचा गुन्ह्यांत वापर होतो, हे लक्षात घेता, बाल गुन्हेगारांचे वय घटवण्याचा प्रस्तावही सरकारकडे आहे. बलात्कारप्रकरणांप्रमाणेच ड्रग्ज तस्करीच्या बाबतीतही हे वय कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ड्रग्ज तस्कर प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी किरकोळ गुन्हे करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र केंद्र सरकारने आता अशा गुन्ह्यांना मागे घेऊन थेट प्रत्यार्पण करता येईल, अशी परवानगी दिली आहे. राज्य सरकार त्यानुसार प्रक्रिया सुरू करणार आहे.
