विशेष प्रतिनिधी
मुंबई : 1993 च्या भीषण मुंबई बॉम्बस्फोटांना रोखणे शक्य होते, मात्र अभिनेता संजय दत्त याने पोलिसांकडून एका अत्यंत महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवली. ज्यामुळे ही दुर्घटना घडली, असे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील आणि राज्यसभेचे नूतन खासदार उज्ज्वल निकम यांनी सांगितले. (The Mumbai blasts could have been prevented, but one mistake by Sanjay Dutt turned out to be fatal…)
एका खास मुलाखतीत निकम यांनी संजय दत्तच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले की, “स्फोटांच्या काही दिवस आधी दाऊद इब्राहिमचा सहकारी अबू सालेम हा एक शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन संजय दत्तच्या घरी गेला होता. त्यामध्ये हँड ग्रेनेड, एके-४७ आणि इतर शस्त्रसाठा होता.”
संजय दत्तने त्या व्हॅनमधून एके-४७ बंदूक घेतली आणि ती स्वतःकडे ठेवून घेतली. काही वस्तू त्याने परत केल्या, पण ही बंदूक मात्र त्याने आपल्या घरात ठेवली. “जर संजयने पोलिसांना त्या व्हॅनबद्दल जिचा वापर पुढे बॉम्बस्फोटांसाठी करण्यात आला त्याबाबत माहिती दिली असती, तर संपूर्ण कटच उधळून लावता आला असता. संजय दत्त निर्दोष होता. त्याला शस्त्रांची आवड होती म्हणूनच त्याने एके-४७ ठेवली. त्याने ती कधी वापरली नाही. पण कायद्याच्या दृष्टीने बंदी असलेले शस्त्र बाळगणे गुन्हा ठरतो. त्यामुळे त्याला शस्त्र कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले.टाडा (दहशतवाद आणि विध्वंसक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा) अंतर्गत त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते, मात्र न्यायालयाने त्याला त्या आरोपातून मुक्त केले. मात्र, शस्त्र कायद्यांतर्गत त्याला शिक्षा झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा 6 वर्षांवरून 5 वर्षांवर आणली.
निकम यांनी आणखी एक प्रसंग सांगितला की, “शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातच संजय दत्त अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरून धक्का स्पष्ट दिसत होता. त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. मी जवळ गेलो आणि त्याला सांगितलं ‘संजय, अशा प्रकारे वागू नकोस, मीडिया पाहत आहे. जर तू घाबरलेला दिसलास, तर लोक तुला दोषी मानतील. तुला अपील करण्याची संधी आहे.’” त्यावर संजय दत्त म्हणाला, ‘हो सर, हो सर…’
