विशेष प्रतिनिधी
बस्तर : छत्तीसगडमधील बस्तर विभागात २४ जुलै २०२५ रोजी देशाच्या नक्षलविरोधी लढ्यात ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. राज्यातील पाच प्रमुख नक्षलप्रभावित जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी तब्बल ६६ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. बस्तरमधील बीजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, सुकमा आणि कांकेर या जिल्ह्यांमध्ये हे आत्मसमर्पण झाले. ( Red Terror suffers setback 66 Naxalites surrender in a single day in Chhattisgarh)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूरमध्ये २५, दंतेवाड्यात १५, नारायणपूरमध्ये ८, सुकमामध्ये ५ आणि कांकेरमध्ये १३ नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली.
या सर्व नक्षलवाद्यांवर मिळून एकूण १.३ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे, आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. यावरून माओवादी संघटनांच्या लिंगनिरपेक्ष भरती धोरणाचे आणि ग्रामीण भागांतील महिलांचे शोषण कसे चालले होते, हे उघड झाले आहे.
या घटनेमुळे केवळ नक्षलवादी चळवळ कमजोर झाला असूनसरकारच्या सातत्यपूर्ण कारवाईचा स्पष्ट परिणामही दिसून आला. २०२५ या वर्षात आतापर्यंत १,००० हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गेल्या दोन वर्षांत ५०० हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी विविध ऑपरेशन्समध्ये ठार केले आहे. ही मोहीम राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संयुक्त पातळीवर राबवली जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा सरकारची कठोर भूमिका मांडली. जे नक्षलवादी शांततेचा मार्ग स्वीकारतील, त्यांना पुनर्वसनाची संधी दिली जाईल, पण जे अजूनही बंदूक घेऊन जंगलात लपून बसले आहेत, त्यांच्यावर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांनी नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदतही जाहीर केली आहे.
छत्तीसगडच्या बस्तर विभागात अनेक वर्षांपासून हिंसेचे आणि दहशतीचे सावट होते. मात्र गेल्या काही वर्षांत सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि ग्राम सुरक्षा समित्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा परिसर हळूहळू मुख्य प्रवाहात येत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक तरुण, तरुणी, किशोरवयीन मुले आणि ग्रामीण महिलांचा समावेश असल्याने ही केवळ शस्त्र ठेवण्याची नाही, तर एका संपूर्ण विचारसरणीच्या पराभवाची नोंद ठरते.
या विकासामुळे बस्तरमध्ये नव्याने शांतता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि विकासाच्या वाटा खुल्या होत आहेत. हे आत्मसमर्पण म्हणजे सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचा, लोकांच्या पाठिंब्याचा आणि सुरक्षित भविष्यासाठी घेतलेल्या निर्णायक टप्प्याचा पुरावा आहे. एकेकाळी नक्षलवाद्यांचे गड मानले जाणारे हे भाग आता हळूहळू ‘रेड टेरर’च्या सावटातून बाहेर पडत असून, नवे भविष्य आकार घेत आहे.
