राहुल गांधी यांच्या पंक्तीत शरद पवारही, म्हणे दोन माणसे 288 पैकी 160 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची देत होते गॅरंटी

विशेष प्रतिनिधी

नागपूर : आत्तापर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारही आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. मला दोन माणसे भेटली. राज्यातील 288 पैकी 160 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. मात्र, त्यावेळी माझा निवडणूक आयोगावर विश्वास असल्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ( Sharad Pawar also in Rahul Gandhis row two men were allegedly giving guarantees to get candidates elected on 160 out of 288 seats
Special Correspondent)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नागपूर येथे बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. पवार म्हणाले, ती दोन माणसे दिल्लीत भेटायला आली. मात्र, असल्या गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली. मात्र, लोकशाहीवर विश्वास असल्याने आम्ही दोघांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या लोकांनी आपले म्हणणे त्यांनी राहुल गांधी यांच्यापुढे मांडले. मी या प्रकरणी जनतेच्या दरबारात जाण्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष केले. पण काल दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात अतिशय कष्ट करून सफल अभ्यास करून त्याची मांडणी करण्यात आली.
राहुल गांधी यांनी बोगस मतदानाची विविध उदाहरणे दिली. केवळ उदाहरणे दिली नाहीत, तर त्याचा आधारही दाखवण्यात आला. पण आज निवडणूक आयोगाने त्याचा वेगळा अर्थ लावण्याचे ठरवलेले दिसते. त्यांनी राहुल गांधी यांना चर्चेचे निमंत्रण दिले. पण ते देताना शपथपत्र देण्याची अट घातली. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की, मी संसदेत सदस्य होताना मी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता शपथ घेण्याची गरज नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने शपथपत्र मागण्याचा धरलेला आग्रह योग्य नाही असे माझ्यासारख्या व्यक्तीला वाटते, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी जे प्रेझेंटेशन केले, त्या प्रकरणी खोलात जाण्याची गरज आहे. घटनात्मक लोकशाहीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार याद्यांतील घोळाविषयी व्यक्त केलेली भूमिकाही फेटाळून लावली. माझे म्हणणे फक्त एकच आहे की, आक्षेप कुणाबद्दल आहे? आम्ही मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेतला नाही. आमचा आयोगावर आक्षेप आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर आक्षेप घेतल्यानंतर भाजप किंवा मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडायला पुढे येण्याची गरज नाही. आम्हाला उत्तर निवडणूक आयोगाकडून हवे आहे, इतर कुणाकडूनही नाही. आम्ही स्वस्थ बसणार नाही. याचा निकाल घ्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल तर ते देशाला सांगितले पाहिजे. पण नसेल तर जे काही सत्य आहे ते पुढे आले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत कुठे बसले होते, यावरून वाद सुरू झाला आहे. तिथे पॉवर पॉइंट सादरीकरण होते. आपण चित्रपट पाहण्यासाठी जसे मागच्या सीटवर बसतो, तसे आम्ही तिथे मागच्या बाजूला बसलो. आमच्या शेजारी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही बसले होते. आम्ही मुद्दाम दूर बसलो. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे कुठे बसले? हा विषय कारण नसताना उपस्थित करण्यात आला. तो भाग आता सोडून द्या, असे शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *