पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दीने फुललेल्या पुण्यातील लक्ष्मी रोडवर सोमवारी एक मोठा अपघात होण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आले. पीएमपीएमएलच्या बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला; परंतु वाहतूक पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि स्थानिक रिक्षाचालकाच्या मदतीमुळे चालकाचा जीव वाचविण्यात यश आले.
वारजे माळवाडी येथील अनिल लक्ष्मण अंबुरे (वय ४१) हे चालक सोमवारी दुपारी पीएमपीएमएल बस घेऊन लक्ष्मी रोडवरून जात होते. गर्दीच्या वातावरणात बेलबाग चौकाजवळ पोहोचताच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना तीव्र वेदना जाणवून ते बेशुद्ध झाले. त्यावेळी बसमध्ये प्रवासी होते. बसचे नियंत्रण सुटल्यास भीषण अपघात घडला असता.
फरासखाना वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबल रमेश ढावरे आणि अर्चना निमगिरे यांनी प्रसंगावधान राखून त्वरित बस थांबवली. त्यांनी चालकाला बाहेर काढून पाठीवर झोपवले आणि तातडीने सीपीआर (हृदय पुनरुज्जीवन) सुरू केले. काही मिनिटांतच चालकाला शुद्ध आली.
दरम्यान, गर्दीमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नसल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी जवळील ऑटो रिक्षाचालक राजेश शंकर अर्कल (रा. मार्केट यार्ड) यांची मदत घेतली. त्यांनी चालकाला त्वरित रिक्षेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.
लक्ष्मी रोडसारख्या व्यापारी भागात, विशेषतः गणेशोत्सवाच्या दिवसांत, प्रचंड गर्दी असते. अशा वेळी बसचे नियंत्रण सुटले असते तर गंभीर जीवितहानी झाली असती. पोलिसांच्या जागरूकतेमुळे आणि माणुसकीमुळे मोठा अपघात टळला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. “पोलिसांनी जर प्रसंगावधान दाखवले नसते तर भीषण अपघात झाला असता. त्यांनी दाखवलेली तत्परता ही खऱ्या अर्थाने जनतेची सेवा आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाल्या.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, जीवनरक्षक भूमिकेबद्दल पोलिस कर्मचारी आणि रिक्षाचालक यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.
