पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज दहा लाखांचा दंड, वाहतूक पोलिसांची कडक कारवाई; २६५ दिवसांत २५ कोटी वसुली

पिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी केलेल्या व्यापक कारवाईमुळे दंड वसुलीचा आकडा विक्रमी ठरला आहे. वर्षभरातील अवघ्या २६५ दिवसांत तब्बल ३ लाख २७ हजार ४३७ प्रकरणांवर कारवाई करून पोलिसांनी २५ कोटी २ लाख ८० हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे दररोज सुमारे ९ लाख ४५ हजार रुपयांची दंडवसुली झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
( Fines of Rs 10 lakh per day in Pimpri-Chinchwadstrict action by traffic policeRs 25 crore recovered in 265 days)

वाहतूक नियमभंगावरील कारवाईदरम्यान ऑगस्ट महिना विशेष ठरला. या महिन्यातच तब्बल ३ कोटी रुपयांच्या घरात दंड वसुली झाली असून सरासरी दहा लाख रुपयांचा दंड दररोज आकारला गेला. हे आकडे वाहनचालकांच्या निष्काळजीपणाचे आणि पोलिसांच्या कडक भूमिकेचे द्योतक आहेत.

वाहतूक पोलिसांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणे, वेगमर्यादा उल्लंघन, सिग्नल तोडणे, बेकायदेशीर पार्किंग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, तसेच परवानगीपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे यांसारख्या उल्लंघनांवर कारवाई केली आहे. नियमभंगाच्या स्वरूपानुसार दंड ठोठावण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना यात शिक्षा भोगावी लागली आहे.

औद्योगिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात दररोज लाखो वाहने रस्त्यावर उतरतात. वाढत्या लोकसंख्या आणि वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण रोखणे हे मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नियमभंगाविरुद्ध कडक कारवाईचा धडाका सुरू केला असून त्याचा परिणाम दंड वसुलीतून दिसून येत आहे.

दंडवसुलीच्या या आकडेवारीबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिश्र स्वरूपाचा आहे. काही नागरिकांच्या मते दंडाचे दर जास्त असून सामान्य वाहनचालकांवर आर्थिक बोजा पडतो. तर काहींनी वाहतुकीतील शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचे पाऊल योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. “दंड टाळण्यासाठी नियमांचे पालन करा,” हा संदेश पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.

वाहतूक विभागाने शहरातील नियमभंग करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दंड करण्याबरोबरच वाहतुकीला सुरळीत करतानाच नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. असे वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *