विशेष प्रतिनिधी
लोणी काळभोर : पश्चिम हवेलीतील सांगरूण, बहुली व खडकवाडी-कुडजे या गावातील तीन महिला तलाठी हस्तलिखित सातबारा, संगणकीकृत सातबारा व आठ अ उतारा यासाठी शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
( Three female Talathis caught by Anti-Corruption Bureau at the same time)
यापैकी एका महिला तलाठ्याला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले आहे. तीनही महिला तलाठ्यांवर खडक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदादेवी पुरूषोत्तम पाटील (वय ४० ,तलाठी खडकवाडी कुडजे, हवेली, पुणे रा. सर्व्हे न. ५७/१, कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, सोलापूर रोड, पुणे मांजरी बुद्रुक ) असे लाच स्वीकारलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. प्रेरणा बबन पारधी (वय ३०, तलाठी सांगरूण, हवेली पुणे रा. फ्लॅट न. ७एस, २/४ए, जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण, पुणे) व दिपाली दिलीप पासलकर (वय २९, तलाठी बहुली,हवेली, पुणे रा.ठि. लेन न.४, स्वामी समर्थनगर, कोंढवा, काकडेनगर, पुणे ४८) या दोन महिला तलाठ्यांवर लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ४२ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
तक्रारदार हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना हवेली तालुक्यातील सांगरून, बहुली, खडकवाडी आणि कुडजे या गावाच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोड मध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच आठ अ उताराचे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत हव्या होत्या. त्यासाठी ते सांगरूण येथे कार्यरत असलेल्या तलाठी प्रेरणा पारधी, बहुली येथील तलाठी दिपाली पासलकर व खडकवाडी कुडजे येथील तलाठी शारदा देवी पाटील यांना भेटले. त्यावेळी सांगरुण गावातील तक्रारदार यांना आवश्यक असलेल्या सातबाराच्या व आठ अ उताऱ्याच्या २४० प्रतीसाठी तलाठी पारधी यांनी सरकारी फी व्यतिरिक्त १६ हजार ४०० रुपयाची लाचेची मागणी केली होती.
बहुली गावातील आवश्यक असणाऱ्या सातबाराच्या व उताऱ्याच्या १०६ प्रतिसाठी संबंधित गावचे तलाठी दिपाली पासलकर यांनी शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त ४ हजार ९१० रुपयांची लाच मागितली होती. खडकवाडी व कुडजे गावातील तलाठी शारदा देवी पाटील यांनी सातबाराच्या व उताऱ्याच्या एकूण ३२ प्रतिसाठी सरकारी शुल्काच्या व्यतिरिक्त १ हजार ५२० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सांगरूण गावाच्या प्रेरणा पारधी यांनी सातबाराच्या व उताऱ्याच्या २४० प्रतींसाठी ३ हजार ६०० रुपये होत असताना, तक्रारदार यांच्याकडून तक्रारीपुर्वी ४ हजार रुपये स्विकारून आणखी १२ हजार ४०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बहुली येथील तलाठी दिपाली पासलकर यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारदार यांना १०६ सातबाराच्या व उताऱ्याच्या प्रती पाहिजे होत्या. त्यासाठी सरकारी फी १ हजार ५९० रुपये होत होते. परंतु, त्यांनी ६ हजार ५०० होत असून सांगरूण गावाच्या तलाठी प्रेरणा पारधी यांच्याकडे ती रक्कम देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.
तिनही महिला तलाठ्याच्या घरझडतीसाठी पथके तात्काळ रवाना करण्यात आलेले आहेत. घरझडतीची प्रक्रिया सुरु असून या तिघींच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात लाचेचा व लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करीत आहेत.
