लिफ्टमध्ये अडकलेल्या ११ वर्षीय मुलाने वडिलांच्या मांडीवर सोडला जीव

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या चोविसावाडी येथे गुरुवारी सायंकाळी लिफ्टच्या एका भीषण अपघातात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा इमारतीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये लिफ्टमध्ये अडकला होता. दसऱ्याच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात घडला असून मुलाने वडिलांच्या मांडीवरच जीव सोडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेय साहेबराव फडतरे (११, रामस्मृती हाउसिंग सोसायटी, चोविसावाडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
( 11-year-old boy trapped in elevator dies in fathers lap)

अमेय गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून खाली येत होता. तो लिफ्टमध्ये गेला आणि त्याने तळमजल्यावर जाण्यासाठी बटण दाबले. त्यानंतर लिफ्ट चौथ्या मजल्यावरून काही अंतर खाली गेली आणि दोन मजल्यांच्या माध्यभागी अडकली. लिफ्ट बंद पडल्याने अमेय बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी लिस्ट अचानक सुरु झाली आणि अमेयचा अपघात झाला. तो बराच वेळ अडकलेल्या अवस्थेत होता. ही बाब सोसायटी मध्ये कोणाच्याही लक्षात आली नाही. सायंकाळी पाच वाजता अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळाली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोहोचले त्यावेळी अमेय याचे वडील त्याला अडकलेल्या अवस्थेत मांडीवर घेऊन बसले होते. अनिशान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लिफ्ट मॅन्युअल केली आणि अमेय याला बाहेर काढले. त्याला अग्निशमन विभागाच्या देवदूत वाहनातून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *