दोन्ही राष्ट्रवादीतील संघर्ष, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण

पुणे : वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट) यांना धानोरी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Clash between two nationalistsVadgaonsheri MLA Bapusaheb Pathare beaten up)

आमदार पठारे हे रविवारी एका स्थानिक नागरिकाने आयोजित केलेल्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचवेळी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी प्रलंबित विकासकामांच्या मुद्द्यावर आंदोलानाची तयारी सुरू केली होती. यावेळी पठारे यांनी या आंदोलनाबाबत विचारणा केली. “विकासकामे सुरू आहेत, मग आंदोलनाची गरज काय?” असा सवाल त्यांनी केला.

त्यावरून वाद वाढत गेला. पठारे यांनी ‘तुम्ही आमच्या जीवावर नेते झालात, आम्हीच तुमच्या मागे उभे राहिलो’ असे वक्तव्य केल्यावर वातावरण अधिक तापले. हा वाद काही क्षणातच हिंसक बनला. साक्षीदारांच्या मते, सुमारे १० ते १५ जणांनी पठारे यांचा पाठलाग करून ढकलाढकली आणि मारहाण केली.
या घटनेत बंडू खांदवे आणि अजित पवार गटातील त्यांच्या काही सहकाऱ्यांची नावे पुढे येत आहेत. राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार आणि अजित पवार गटातील मतभेद तीव्र झाले आहेत. या घटनेने या अंतर्गत कलहाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहेत. घटनेदरम्यान काही कार्यकर्ते मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचेही समोर आले असून, त्यावरून दोषींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेनंतर आमदार पठारे यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन
मारहाणीच्या घटनेनंतर आमदार बापूसाहेब पठारे हे थेट विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाला बसले. रात्री उशिरापर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांवर कारवाईत विलंब केल्याचा आरोप करत पठारे समर्थकांनी संताप व्यक्त केला.

या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत विविध पक्षांनी “हे लोकशाहीवरील हल्ला आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी म्हटले, “राजकारणात मतभेद असतातच, पण एखाद्या आमदारावर हल्ला करणे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे.”