विशेष प्रतिनिधी
पुणे: एपीके फाईल पाठवून महिलेच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने नऊ लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ( Online theft of Rs 9 lakh from bank account by sending APK file!)
याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ड नुसार अनोळखी मोबाईल वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथे राहतात. त्या एक गृहिणी आहेत. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांना अनोळखी क्रमांकावरून एपीके फाईल प्राप्त झाली. ही फाईल ओपन केल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईल फोनचा रिमोट अॅक्सेस घेतला. तक्रारदार महिलेच्या दोन बँक खात्यांमधून ऑनलाईन माध्यमातून नऊ लाख रुपये चोरले. दरम्यान, आपल्या बँक खात्यामधून पैसे परस्पर काढले गेल्याचे तक्रारदार महिलेला समजले. तेव्हा त्यांनी चौकशी केली असता ऑनलाईन माध्यमातून सायबर चोरट्यांनी पैसे चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.
