डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.
( Economic Offences Wing PSI Caught Red-Handed by ACB While Accepting ₹46.5 Lakh Bribe)
प्रमोद चिंतामणी (वय 35) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी एका वकिलाने तक्रार दिली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधान पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास आरोपी उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. आशिल व त्याच्या वडिलांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच जामीन प्रक्रियेवर सोयीस्कर भूमिका घेण्यासाठी चिंतामणी याने 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
त्यातील 1 कोटी स्वतःसाठी आणि 1 कोटी वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी असल्याचे आरोपीने स्पष्ट केल्याचे पडताळणीदरम्यान निष्पन्न झाले. पहिला हप्ता म्हणून 50 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार, एसीबीकडून 27 ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी झाली. त्यानंतर, चिंतामणी याने लाचेची रक्कम घेऊन फिर्यादी यांना रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिरासमोर बोलावले.
याठिकाणी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. लाचेच्या रकमेत 1 लाख 50 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या तर, 45 लाख रुपयांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे एसीबीने सांगितले.
आरोपीच्या अंगझडतीत रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, 3,600 रुपये तसेच शासकीय ओळखपत्र मिळाले. आरोपीच्या घराची झडती सुरू असून संपूर्ण कारवाईचे पंचनामे करण्यात येत आहेत.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येत आहे. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे करीत आहेत. ही सापळा कारवाई अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, अविनाश घरबुडे, पोलीस अंमलदार भूषण ठाकुर, रवि दिवेकर, सुप्रिया काळे, प्रवीण तावरे, विकास आडके, दीपक दिवेकर, चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महत्त्वाचे मुद्दे :
•मागणी 2 कोटींची, स्वीकारताना पकडले 46.50 लाख रुपये
•लाच मागणी ‘वकील फी + बँक बॅलन्स’ पाहून ठरवली
•एका कोटीचा हिस्सा वरिष्ठ अधिकाऱ्यालाही देण्याची मागणी
•ACB ची मोठी कारवाई, पुणे पोलीस दलात खळबळ
