डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन महिला नेत्यांमधील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद वाढला आहे. फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून सुरू झालेला तणाव आता पक्षशिस्तीच्या पातळीवर पोहोचला आहे.
( Rupali Thombre Patil vs Rupali Chakankar Internal Rift Erupts in NCPShow-Cause Notice Issued to Thombre Patil Over Indiscipline)
रूपाली ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर सार्वजनिकरित्या तीव्र शब्दांत टीका करत आरोप केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी केली आहे. संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनाही देण्यात आली आहे.
पक्षाने म्हटले आहे की, “आपण प्रवक्त्या या जबाबदार पदावर असताना पक्षाच्या महिला विभाग प्रमुखांविरुद्ध प्रसारमाध्यमांत केलेली विधाने अनुचित आहेत आणि पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहेत.”
या कारवाईनंतर पाटील यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की, “मी पक्षाशी निष्ठावान आहे, पण महिलांविरुद्ध अन्याय झाल्यावर मी गप्प बसणार नाही. डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणात मला अन्याय झाल्याचे वाटते, त्यामुळे मी आवाज उठवला.”
दरम्यान, पाटील पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी हा प्रकार गंभीरतेने घेत ठोंबरे यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतल्याचे समजते.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळला आहे. अजित पवार गट शिस्तभंगाविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे, तर दोन महिला नेत्यांमधील संघर्षामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याचे स्पष्ट दिसत आहे. आगामी काही दिवसांत रूपाली ठोंबरे पाटील यांचा खुलासा पक्ष नेतृत्वासमोर येणार असून, त्यानंतर कारवाई होते की वाद मिटतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
