राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधान परिषदेत कृषीमंत्री धनंजय मुंडे विरोधकांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. मंत्री सभागृहात उपस्थितीत असताना विरोधी पक्षनेते आणि आमदार उपस्थितीत नसल्याने धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
धनंजय मुंडे म्हणाले, फक्त टीका करायला विरोधक उपस्थित राहतात, पण सरकार उत्तर द्यायला उपस्थितीत राहिलं की विरोधी बाकावर एक सदस्य सोडून कोणीही उपस्थितीत नसतं. यासारख दुसरं दुर्दैव नाही. मी अनेक वर्षे या सभागृहाचा सदस्य राहिलो. पण हे चित्र मी कधीच पाहिले नाही. मी देखील विरोधी पक्ष म्हणून या सदनात काम केलय.मागील आठवड्यात ता. 18 जुलै आणि 20 जुलै रोजी विरोधी बाकावरील आमदार विक्रम काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने सादर केलेल्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज (ता. 25 जुलै) कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. पण हे उत्तर हे ऐकण्यासाठी विरोधी बाकावर कोणीही नसल्याने धनंजय मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
विरोधकांच्या अनुपस्थितीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, 260 च्या प्रस्तावावर उत्तर ऐकण्यासाठी विरोधी बाकावर सदस्य नरेंद्र दराडे यांच्याशिवाय कोणीही नाही. सत्ता पक्षाकडून प्रस्ताव आला की त्याला विरोध करायचा आणि विरोधी पक्षानेच प्रस्ताव दिला तर त्या प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यावर टीका करायची. पण ज्यावेळी सरकार प्रश्नांची उत्तरे द्यायला असते, तेव्हा विरोधी बाकावर एका व्यक्तीशिवाय कोणीही नसते. याच्यासारखे दुर्दैव या सभागृहात कधीही पाहिले नाही.
विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्ष उभा असताना ते ऐकण्यासाठी विरोधी पक्ष सभागृहात उपस्थित नाही, हे महाराष्ट्राला कळाले पाहिजे, असे सांगत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
