संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले का? अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडेंची राऊतांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाली होती. या सभेत पवारांसह जितेंद्र आव्हाडांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना ताकद देतानाच कृषिमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या सभेनंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. याचवेळी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावरुनच आता मुंडेंनी संजय राऊतांना फैलावर घेत त्यांना खडे बोल सुनावले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, संस्थेतील राजीनामाचा प्रश्न हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून निर्णय घेतील, कारण हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का? असा खोचक सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

येत्या 27 तारखेला अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आज एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 27 तारखेची सभा ही यापूर्वीच होणार होती, मात्र काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 17 तारखेला झालेल्या शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नसून बीड जिल्ह्याची अस्मिता, विकास सन्मानाची सभा आहे. 17 तारखेला झालेल्या सभेला 2024 मध्ये जनता जनार्दन उत्तर देईल.

दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत पैसे देऊन लोकांना जमवल्याचा आरोप होत आहे. तर, काही महिला पैसे वाटप करत असल्याचे देखील तथाकथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पवारांच्या सभेला महिलांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर अजून तरी दोन्ही गटाची अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाही.