महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राज्यातील जनतेनं गेल्या दोन वर्षांत नव भूतो न भविष्यती राजकारणातील अनेक मोठ्या घडामोडींचा अनुभव घेतला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका खासदारानं केला आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचा दावा बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले की, “वरिष्ठ लोकांना डावलून विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने काँग्रेसमधील सगळे वरिष्ठ नेते अतिशय अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घ्यायची गरज नाही. संबंधित नेत्यांची नावं आपल्या सर्वांना माहीत आहेत. ते सर्वजण अतिशय अस्वस्थ झाले आहेत. ते योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात महायुतीत सहभागी होईल.”खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांनी असा दावा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महिनाभरापूर्वी सुद्धा त्यांनी असाच दावा केला होता.
जसं शिवसेनेचा एक मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा गट महायुतीमध्ये सहभागील झाला. आता काँग्रेसचाही मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार… खासदार तर त्यांच्या नाहीयेत, पण आमदार महायुतीमध्ये नक्की सहभागी होतील. आता नेमका आकडा मला माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार आहे. असा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
