एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा; नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

खासदार गजानन कीर्तिकर यांचा ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. मुंबईतल्या सहारा हॉटेल येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील उपस्थित होते. नारायण राणे यांनी या प्रकाशन सोहळा कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, या पुस्तकामध्ये ५७ वर्षांचा शिवसेनेचा इतिहास लिहिला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी हे जरुर वाचावं. माझाही पुस्तकात उल्लेख केला असून आम्ही सुरुवातीपासूनच शिवसेनेते होतो. शिवसेनेत आलो तेव्हा मी १५ वर्षाचा होतो. दुसऱ्या मुलाला पुढे करत त्याचं नाव नारायण राणे सांगून मी शिवसैनिक झालो, कारण मी लहान होतो अन् हाईट पण कमी होती.

यावेळी नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तोफ टाकली. सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली आणि बदल्यात तडजोड करत एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलाय. इतकंच नाही तर एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा आरोपही राणेंनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी लावा मी उत्तर द्यायला तयार आहे, असंही राणेंनी म्हंटलंय. नारायण राणेंच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

“एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप करतात. मग, तुम्हाला आम्ही काय बोके दिले का? खोकेच दिले ना. उद्धव ठाकरेंनी नाही म्हणावं, मग मी दिवस सांगतो. आम्ही सुद्धा कुठल्या दिवशी काय दिलं, कोणत्या गेटने आत गेलो, याची डायरी लिहिली आहे. आम्ही ‘मातोश्री’वर असताना संजय दत्त बॅग घेऊन कुठल्या गेटने आत आला होता, हे सुद्धा माहिती आहे,” असा दावाही नारायण राणेंनी केला आहे. असे गंभीर आरोप करत राणे पुढे बोलले की, एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, जालन्यामध्ये जे झालं त्यात लक्ष द्या. मराठा समाज 34 टक्के आहे, कोणत्याही जातीचा अंत पाहू नका.. लक्ष द्या.