काश्मीर-अरुणाचलमध्ये G20 बैठक घेणे आमचा अधिकार; देशाच्या प्रत्येक भागात कार्यक्रम होतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबर रोजी 20-20 शिखर संमेलन होत आहे. या संमेलनासाठी जगातील 20 शक्तिशाली देशांचे प्रमुख दिल्लीत येणार असल्याने संपूर्ण जगाच्या नजरा दिल्लीकडे लागलेल्या आहेत.त्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरच्या प्रश्नावरून चीन आणि पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. आम्ही बैठका कुठे घ्यायच्या हे सांगण्याचा अधिकार हा या दोन्ही देशांना नाही. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताकडून जी-20च्या बैठका काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्याबाबत पाकिस्तान आणि चीनने घेतलेले आक्षेप फेटाळून लावले आहेत. यजमान देशानं त्याच्या कुठल्याही भागात बैठका घेणं स्वाभाविक आहे. तसेच हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले होते.

उल्लेखनीय आहे की मे महिन्यात भारताने काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा आणि चीन आणि पाकिस्तानच्या तीव्र विरोधादरम्यान G-20 पर्यटन बैठक आयोजित केली होती. ही बैठक काश्मीरमध्ये घेण्याच्या निर्णयावर चीन आणि पाकिस्तानने आक्षेप घेतला होता, ज्याला ते विवादित क्षेत्र म्हणतात. चीन हा G-20 चा सदस्य देश आहे, पण पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाही. चीनने तर अरुणाचल प्रदेशवर भारताच्या सार्वभौमत्वावर वाद निर्माण केला आहे. भारताने यापूर्वीच चीन आणि पाकिस्तानचे दावे फेटाळून लावले आहेत.

यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी चीनने नकाशा जारी करून अरुणाचल आणि अक्साई चीनला आपला हिस्सा घोषित केले होते. पीएम मोदींच्या या वक्तव्याला चीनच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणूनही पाहिले जात आहे.2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मग आपल्या जीवनात भ्रष्टाचार, जातिवाद, जातीयवाद यांना स्थान राहणार नाही. फार पूर्वी जग भारताला 100 कोटी भुकेल्या लोकांचा देश मानत होता, पण आता आपण 100 कोटी महत्त्वाकांक्षी मनांचा आणि 200 कोटी कुशल हातांचा देश झालो आहोत.

दहशतवाद आणि भष्ट्राचारावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, भारत सरकार काही पावले उचलत आहे, ज्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे, दहशतवादी संघटनांना मिळणारा निधी संपवणे आणि दहशतवादाच्या कल्पना पसरवण्याविरुद्ध जनजागृती करणे यासह काही पावले उचलली जात आहेत. भ्रष्टाचाराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही भारताची मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.