राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येण्यास सुरुवात झाली आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार आज घडला. यावर भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “मल्हारी मार्तंडाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा ‘भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं आणि श्रद्धेचं प्रतिक असून त्याचा आंदोलनासाठी वापर करणे योग्य नाही. जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल, तर विखे पाटलांनी तो भंडारा खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून कपाळाला लावावा, अशी विनंती असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
पडळकर यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. मी समस्त माझ्या बंधू-भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला लागू नका. धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या आपण सर्वोच्च न्यायालयात लढत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळत आहे. त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, असंही पडळकर यांनी म्हटलं. “धनगर समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात आपण लढतो आहोत. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केले आहे. आम्हाला खात्री आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला यश देईल,” असे पडळकर म्हणाले.
लबाड लांडगा काकाच्या नादी लागू नका, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठीची लढाई कायदेशीररित्या आपण सर्वोच्च न्यायालयात लढत असून त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य आपल्याला मिळत आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच यश मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
