आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत होत्या. त्यांना दिलासा मिळाला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात थेट वरिष्ठ आयपीएसअधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव घेतले गेले होते. या प्रकरणी दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हे प्रकरण संपणार असल्याची शक्यता आहे.
या प्रकरणात पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हे दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले होते.दरम्यान, पुण्यातील प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणात शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता. आता मुंबई हायकोर्टाकडून त्यांना या प्रकरणी क्लिनचिट मिळाली आहे.
रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्या आणि पोस्टिंगमधील अनियमितता अधोरेखित करणाऱ्या रश्मी शुक्ला यांनी तयार केलेल्या गोपनीय अहवालाच्या खुलासाशी संबंधित असलेल्या राजकीय नेते-पोलीस संबंधातील वादग्रस्त प्रकरणावर याआधी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने पडदा टाकला होता.
