केरळमध्ये निपाह व्हायरस मुळे दोघांचा मृत्यू; केंद्राने तज्ज्ञांची टीम पाठवली

केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसमुळे दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आल्याचं मनसुख मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, केरळमध्ये निपाह विषाणूमुळे पहिला मृत्यू 30 ऑगस्ट रोजी झाला आणि दुसरा मृत्यू 11 सप्टेंबर रोजी झाला. आता पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्थानिक आरोग्य कर्मचार्‍यांना त्यांच्या भागात कडक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, केरळमधील इतर चार जणांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मध्ये निपाह व्हायरसच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

2018 आणि2021 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दक्षिण भारतातील पहिला निपाह विषाणूचा रुग्ण 19 मे 2018 साली कोझिकोड येथे आढळून आला होता.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, निपाह विषाणूचा संसर्ग हा एक झुनोटिक आजार आहे. जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. त्याचबरोबर दूषित अन्न किंवा थेट संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या विषाणूची लागण होते. निपाह विषाणूच्या संसर्गामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. अगदी लक्षणं नसलेल्या (सबक्लिनिकल) संसर्गापासून ते तीव्र श्वसनाचे आजार आणि प्राणघातक एन्सेफलायटीसपर्यंतचे विविध आजार होतात.

निपाह व्हायरस केवळ प्राण्यांद्वारेच नाही तर हा संसर्गजन्य आजार असून एका रुग्णापासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच निपाहची लागण झाल्यानंतर रुग्णाला ताप, डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणं अशी लक्षणे दिसून येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून दावा करण्यात आला आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 12 सप्टेंबर रोजी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, निपाह व्हायरसमुळे दोन लोकांच्या मृत्यूवर सरकार गंभीर आहे. मृतांच्या संपर्कात असलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. कोझिकोडमध्ये आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. राज्यात निपाहचा उद्रेक अद्याप अधिकृतपणे घोषित झालेला नाही.