मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार आज संध्याकाळी मनोज जरांगे यांना भेटणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस आहे. आजही त्यांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जालन्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही जालन्यात यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यातच मराठा आंदोलकांनी आजही आंदोलन सुरूच ठेवलं आहे. बुलढाण्यात तर मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचं काय होणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जातील. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचं उपोषण आज सुटणार का? असा प्रश्न आहे.

दरम्यान, पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन चंद्रकांत पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत.

या संदर्भात मनोज जरांगे म्हणाले, “काही हरकत नाही, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी मला भेटायला यावं. मात्र, ते भेटायला येणार आहे की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळही दिला आहे. ते इथे आल्यावर त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करूच.” आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची, कुणबी प्रमाणपत्राची आहे. हीच मागणी ते भेटायला आल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर करेन,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.