‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मराठा आरक्षण हा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून उपोषण आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी (१२ सप्टेंबर) या दिवशी उपोषण मागे घेण्याचीही विनंती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे त्यात असं म्हणतात की आपण बोलून मोकळं व्हायचं. याविषयीच्या बातम्या समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून एक आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षण प्रश्नी संवदेनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण देण्याचा सरकार प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून याविषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं आहे.

आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलताना दिसत आहेत. हे कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

तसेच आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.