पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नव्या संसद इमारतीवर फडकणार तिरंगा

संसदेचं विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होतंय. 19 तारखेला हे अधिवेशन नव्या इमारतीत शिफ्ट होणार आहे. मात्र त्याआधी, म्हणजे 17 सप्टेंबर रोजी नव्या संसद इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी या नव्या इमारतीत विश्वकर्मा पूजा देखील आहे. योगायोग म्हणजे 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणारे विशेष अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यानंतर संसद भवनाचे पुढील कामकाज नवीन संसदेत होईल. 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या संसदेत होणारे हे पहिले अधिवेशन असेल.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. नव्या संसदेत तीन प्रवेशद्वार आहेत . या तीन प्रवेशद्वारापैकी एक मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या गजद्वारासमोर ध्वजारोहण सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या नव्या इमारतीत विश्वकर्मा पूजा देखील करण्यात येणार आहे.

मुंबईत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन भाजपने सुरु केले आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप सक्रिय होणार आहे. मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी 15 दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीमांचा धडाका असणार आहे. तसेच खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्षांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमात सामील करून घेण्याचे आदेश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहे.

या विशेष अधिवेशनाबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोडही लागू केला जाणार आहे. लोकसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश असणार आहे.