राज्य सरकारच्या नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा शेतकऱ्यांना होतोय फायदा

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात या योजनेसाठी नाव नोंदवलेल्या १ कोटी २० लाख शेतकऱ्यांपैकी ९८ लाख शेतकरी यासाठी पात्र ठरले. त्यापैकी ८५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या या योजनेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात या योजनेचा.लाभ घेण्यासाठी शेतकरी ई सेवा केंद्रावर फॉर्म भरण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी सन्मान योजना चालू झाल्याने शेतकरी आनंदात असल्याचे पहायला मिळत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हप्ता जमा होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रलंबित EKYC करणे व आधारसिडींग कामी पोस्टात खाते उघडायला सुरुवात केली आहे.

मावळ कृषि विभागाच्या कृषि सहायकांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी सन्मान योजनेचे काम चालू आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने ही योजना महत्वाची आहे. यामध्ये त्यांना वर्षाला 6 हजार रुपये शेतीकामासाठी अनुदान मिळते. आता महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचे देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी 6 हजार अनुदान मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यास सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळे आम्हाला फायदा होत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.