भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आरेवाडीत घनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलंय. यावेळीही त्यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडगा’ असा केलाय.धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही, यासाठी शरद पवार जबाबदार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर त्यांनी आणखी आरोपही केले. मराठ्यांना पहिल्यांदा कोणी विरोध केला, तो म्हणजे शरद पवारांनी, असं वक्तव्यही पडळकरांनी केल.
पडळकर म्हणाले, शालिनीताई पाटील यांनी गरीब मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली, त्यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. हीच प्रवृत्ती धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा सुरु करताच टीका करत आहे. धनगर आरक्षणाची लढाई दोन टप्प्यात सुरु आहे. नाताळनंतर न्यायालयीन निकाल अपेक्षित असून भक्कम पुरावे सादर केले आहेत. मात्र धनगर समाजानेही एसटी आरक्षणासाठी रस्त्यावरच्या संघर्षासाठी सज्ज राहावे. गरज पडेल तिथे बाळूमामा व्हा आणि गरज पडेल तिथे बापू बिरु वाटेगावकर व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा पुतण्या पार्टीतनं फुटला. आता त्याचा पुतण्या पार्टीतनं फुटला यात दुसऱ्याचा काय दोष आहे? पण, हे सगळेजण छगन भुजबळांच्या विरोधामध्ये शिव्या शाप द्यायला लागलेत. फुटलाय याचा पुतण्या आणि लागलेत कुणाच्या मागं? छगन भुजबळांच्या. का तर हा माळी समाजाचा माणूस आहे म्हणून. गरीब समाजातला माणूस आहे. तर यांच्या पाठीमागं लागायचं. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केली. पण, या लांडग्याला माहित आहे जर बहुजन एक झाले तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकतं. म्हणून समता परिषदेला दाबायचा प्रयत्न झाला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले असते. परंतु, काही आमदारांना फूस लावली आणि मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले असे ते म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांचाही उल्लेख केला. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण शरद पवारांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही, अस वक्तव्य पडळकरांनी केलं.
