शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार; ‘पीएम किसान’, ‘नमो शेतकरी’साठी साडेतेरा लाख शेतकरी पात्र

‘पीएम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने यंदाची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी ‘पीएम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी पात्र ठरले. कृषी विभागाने ‘नमो किसान योजने’साठी एक हजार ७२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र ठरले आहेत.

नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आला. शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्याचे प्रत्येकी सहा हजार या प्रमाणे दरवर्षी बारा हजारांचा सन्माननिधी बळीराजाला मिळणार आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेसाठी आगामी २०२२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सहा हजार ९०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.

पीएम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली.