मराठा समाजाला आरक्षण देण्याप्रश्नी सरकार सकारात्मक असून कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीतील विविध मुद्द्यांचीही माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
सध्या मराठा आंदोलनाची दिशा भरकटली आहे, आंदोलन दुसऱ्या दिशेला चाललं आहे. याचा विचार मनोज जरांगे पाटील आणि त्यांची टीम, तसेच सकल मराठा समाजाने करणे गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत, त्यांना सुद्धा विचार करण्याची वेळ आहे हे आंदोलक हिंसक का होत आहे, याच्या मागे कोण आहे, ज्या आत्महत्या होत आहेत त्या का होत आहेत? याचा विचार मराठा समाजातील नेत्यांनी करायला हवा. जे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशा भावनेतून काम करत आहेत, त्यांना गावबंदी करुन, आपआपसात मतभेद होऊ लागले, संघर्ष होऊ लागला तर गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत सहानुभूती आहे, शिस्तीची परंपरा आहे, देशाने शिस्त पाहिली, त्याला गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत जी सहानुभूती आहे ती कमी होईल, त्यामुळे मराठा आंदोलन यापूर्वी शांततेने झाली त्याला आता गालबोट कोण लावतंय याचा विचार आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागता कामा नये. मराठा समाजाच्या आडून कोणी अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहेत त्या घडवू इच्छित आहे का? याचा विचार देखील मराठा समाजानं केला पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी केलं.राज्यातील जनतेला देखील मी शांततेचं आवाहन करतो की, राज्यात कायदा सुव्यवस्था आबाधित राखणं ही सरकारची जशी जाबाबदारी आहे, तशीच नागरिकांचीही आहे. मराठा समाजाला कुठलाही गालबोट लागू नये याची काळजी मराठा क्रांती मोर्चानं घेतली मनोज जरांगेंनी घेतली पाहिजे.असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा समाज बांधवांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका. मुलाबाळांचां आईवडिलांचा विचार करा. त्यांना वाऱ्यावर सोडू नका. त्यांना भावनिक आवाहन करतो. आम्ही देणारे आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोणालाही फसवू शकणार नाही, फसवणार नाही, फसवू इच्छित नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
